बार्शी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत जिजाऊ गुरुकुल खांडवीचा विद्यार्थी आदित्य अमिताभ गव्हाणे याने ४४ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला.
दमदार खेळाचे प्रदर्शन करत आदित्यने प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजेतेपद मिळवले.
या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आदित्यच्या यशामुळे जिजाऊ गुरुकुलच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या यशाबद्दल संस्थापक संभाजी घाडगे, सचिवा वर्षा घाडगे, फिजिकल कोच जे. बी. शिंदे मेजर, क्रीडा विभाग प्रमुख गणेश वडेकर यांनी आदित्यचे अभिनंदन केले.
तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आदित्यचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्याच्याकडून जिल्हास्तरीय स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.