सोलापूर – ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणाऱ्या प्राथमिक आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्याच्या प्रयत्नांना आता राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्रक्रियेत ९० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे उळे येथील आरोग्यसेवेच्या गुणवत्तेवर राष्ट्रीय स्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधा, स्वच्छता, रुग्ण सुरक्षा, औषध व वैद्यकीय उपकरणांचे व्यवस्थापन, नोंदवही, सेवा वितरण, व्यवस्थापन तसेच रुग्णकेंद्रित सेवा अशा विविध निकषांवर मूल्यांकन केले जाते. या कठोर मूल्यांकनात उळे आरोग्य मंदिराने ९० टक्के गुण मिळवून मानांकन मिळविले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या मानांकनामुळे केवळ आरोग्य संस्थेच्या कामगिरीला प्रमाणपत्र मिळाले नसून, गावातील नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे. औषधांची उपलब्धता, वैद्यकीय साधनसामग्रीचे व्यवस्थापन, रुग्णांच्या सुरक्षिततेची काळजी, स्वच्छता आणि सेवा प्रक्रियेत सातत्य राखण्यास याचा उपयोग होणार आहे.
चौकट
आरोग्य पथकाच्या मेहनतीला पावती
उळे आरोग्य मंदिराला हे मानांकन मिळवून देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा देशमुख, आरोग्य सेविका कल्पना सावंत, आरोग्य सेवक शुभेंद्र काळे, आशा स्वयंसेविका सत्यभामा साठे, शीतल माळी, फरहाना शेख तसेच अर्धवेळ परिचर माधुरी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोट
३९ आरोग्य मंदिरांचा गुणवत्तेचा प्रवास
सोलापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना मानांकन मिळवून देण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ठेवले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३९ आयुष्यमान आरोग्य मंदिरांना ही मानांकन प्राप्त झाले असून, उर्वरित आरोग्य संस्थांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी या प्रक्रियेला महत्त्व दिले जात असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.