माढा – माढा महावितरण उपविभागातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ७ आॅक्टोंबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग, बार्शी यांना देण्यात आले आहे.
२५ सप्टेंबर रोजी कंत्राटी कर्मचारी सज्जन पोपट पवार यांचा ११ के व्ही लाईनवर काम करत असताना अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून, अद्याप कोणत्याही एजन्सीने किंवा संस्थेने या घटनेची जबाबदारी घेतलेली नाही.
निवेदनात म्हटले आहे की, वारंवार एजन्सी बदलल्यामुळे ४५ दिवस पूर्ण होत नाहीत. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याचा इएसआयसी व पीएफ भरला जात नाही. परिणामी अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय लाभ मिळत नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जखमी कर्मचाऱ्यास वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेकडे व इतर मागण्यांकडे गांभीर्य लक्षात घेऊन
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार ७ ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवेदनाद्वारे कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्या :
१ अपघातग्रस्तास एजन्सीने तातडीने वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत द्यावी.
२ एजन्सी फिक्स करण्यात यावी.
३ दरमहा सर्व कर्मचाऱ्यांचे इएसआयसी व पीएफ नियमित भरावे.
४ दरमहा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार पत्रक (पे-स्लिप) मिळावे.
५ सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ESIC कार्ड काढून द्यावे.
६ अपघाताबाबत मदतीची नेमून दिलेली एजन्सी जबाबदारी घेत नसल्याबाबत प्रशासनाची भूमिका कळवावी व मदतीबाबत लेखी आश्वासन मिळावे.
महावितरण प्रशासनाला दिलेल्या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास काम बंद केल्यामुळे कंपनीच्या कामात येणाऱ्या व्यत्ययाला व्यवस्थापन पूर्णपणे जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे.