सोलापूर : महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमी आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘स्मृती साहित्य सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (७ ऑक्टोबर) सायंकाळी ५.३० वाजता पद्मनगर येथील मर्दा मंगल कार्यालयात हा साहित्यिक-सांस्कृतिक सोहळा होणार आहे.
या सोहळ्यातील साहित्यिक कार्यक्रमात डॉ. रणधीर शिंदे मराठी विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (मराठी) आणि प्रा. डॉ. मोहन पत्तीपाका (तेलुगू) हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. मराठी आणि तेलुगू साहित्याच्या परस्पर संबंधांबरोबरच या दोन्ही भाषांतील साहित्यिक परंपरा, सांस्कृतिक अनुबंध आणि भाषिक सौहार्द यावर या वेळी विचारमंथन होणार आहे.
सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे मराठी-तेलुगू कवी संमेलन. मराठी विभागात गोविंद काळे, राजेंद्र भोसले, डॉ. ममता बोल्ली आणि वंदना कुलकर्णी, तर तेलुगू विभागात सोमण्णा गदवाल, कवयित्री रेणुका बुधारम, अनिल वासम आणि नरेंद्र गुंडेली हे कवी सहभागी होणार आहेत. त्यामुळे दोन्ही भाषांतील काव्यपरंपरेचा संगम या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमात सोलापूरच्या नटराज नृत्य-संगीत विद्यालयातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. साहित्य, कविता, संगीत आणि नृत्य यांचा मिलाफ असलेला हा सोहळा रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. तेलगू भाषा अभिवृद्धी ग्रंथालयमचाही सहयोग या कार्यक्रमाला लाभणार आहे.
महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—-
Post Views: 9