सोलापूर : देशातील सुमारे एक कोटी विडी कामगारांसाठी केंद्र सरकारच्या कामगार विभागाने १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणारे किमान वेतन व महागाई भत्ता जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विडी कामगारांना मोठा दिलासा मिळणार असून, सोलापूर महानगरपालिका क्षेत्राचा ‘ब’ परिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
केंद्र शासनाने विडी उद्योगातील कामगारांसाठी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन परिमंडळांनुसार तसेच कुशल, अर्धकुशल आणि अकुशल श्रेणीनुसार किमान वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील अर्धकुशल विडी कामगारांसाठी मूळ वेतन ४९४ रुपये आणि महागाई भत्ता ३०० रुपये, असे एकूण ७९४ रुपये प्रतिदिन किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे.
‘अ’ परिमंडळात मुंबई, दिल्ली, पुणे आदी शहरांचा समावेश असून, तेथील अर्धकुशल कामगारांसाठी मूळ वेतन व महागाई भत्त्यासह ९३३ रुपये प्रतिदिन किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे. तर ‘क’ परिमंडळातील अर्धकुशल कामगारांसाठी मूळ वेतन ४१० रुपये व महागाई भत्ता २५१ रुपये, असे एकूण ६६१ रुपये प्रतिदिन किमान वेतन जाहीर करण्यात आले आहे.
विडी उद्योगातील चेकर, पान वाटप करणारे, तंबाखू वाटप करणारे तसेच विडी पॅकिंग करणारे कामगार यांचा अकुशल कामगारांच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. सोलापूरचा ‘ब’ परिमंडळात समावेश असल्याने या अकुशल कामगारांसाठी मूळ वेतन ४३७ रुपये व महागाई भत्ता २६७ रुपये, असे एकूण ७०४ रुपये प्रतिदिन किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे.
याशिवाय लिपिक, हेड चेकर आणि ड्रायव्हर या पदांसाठी ९३३ रुपये प्रतिदिन किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे. तर व्यवस्थापक, शाखा अधिकारी आणि लेखापरीक्षक यांच्यासाठी महागाई भत्त्यासह १,०२४ रुपये प्रतिदिन किमान वेतन जाहीर करण्यात आले आहे.
विडी कामगारांना आर्थिक दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या श्रमाला न्याय्य मोबदला मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या कामगार विभागाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयाचे लाल बावटा विडी कामगार युनियन (CITU), सोलापूरच्या वतीने स्वागत करण्यात आले.
युनियनचे अध्यक्ष माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) आणि जनरल सेक्रेटरी कॉ. एम. एच. शेख यांनी केंद्र शासनाच्या या निर्णयाचे जाहीर अभिनंदन केले असून, विडी कामगारांच्या किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही केली आहे.
Post Views: 17