सोलापूर – बदलती जीवनशैली, वाढता ताण आणि अनियमित आहारामुळे असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असताना, हे आजार गंभीर होण्यापूर्वीच हेरण्यासाठी सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाने ‘तिशीचा पल्ला; तपासणी अन् सल्ला’ या १०० दिवसीय विशेष अभियानाला वेग दिला आहे. १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील ३० वर्षांवरील नागरिकांची घरोघरी तसेच आरोग्य केंद्रांवर मोफत तपासणी करण्यात येत आहे.
या अभियानाचा केंद्रबिंदू केवळ आजाराचे निदान करणे नसून, वेळेत तपासणी, संशयित रुग्णांचे संदर्भीकरण आणि पुढील उपचारापर्यंत पाठपुरावा हा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी लक्षणे दिसण्याची वाट न पाहता आरोग्य पथकाकडून तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
( टीप मेल वरील फोटो लावणे)
अभियानांतर्गत आतापर्यंत १ लाख ४६ हजार ७११ नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ९ हजार ७०४ जणांमध्ये उच्च रक्तदाब, तर ८ हजार ९९९ जणांमध्ये मधुमेह आढळून आला आहे. निदान झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी त्यांना आरोग्य संस्थांकडे संदर्भित केले जात आहे.
कर्करोगाच्या प्राथमिक तपासणीलाही मोहिमेत विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
आतापर्यंत ३९ हजार ३८० जणांची मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली असून, १५२ संशयितांना पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच १८ हजार ९७९ महिलांची स्तन कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली असून, ६२ संशयित महिलांना पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी १८ हजार १३० महिलांची तपासणी पूर्ण झाली आहे.
गाव, वाडी-वस्ती पातळीवर आशा स्वयंसेविका, एएनएम, एमपीडब्ल्यू आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविली जात आहे. संशयित किंवा लक्षणे असलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येते. आवश्यकतेनुसार मॅमोग्राफी, बायोप्सी आणि एफएनएसीसारख्या तपासण्या मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
चौकट
तपासणी मोफत; आजाराचे निदान लवकर — उपचाराची संधी अधिक! या उद्देशाने नागरिकांनी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोट
“अनेक असंसर्गजन्य आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणे न दाखवता शरीरात वाढत राहतात. त्यामुळे लक्षणे दिसण्याची वाट न पाहता ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने मोफत आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. आपल्या गावातील आशा स्वयंसेविका, आरोग्य पथक किंवा जवळच्या आयुष्मान आरोग्य मंदिराशी संपर्क साधावा,” असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी केले.
Post Views: 17