सोलापूर : शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि कुत्रा चावण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने उपाययोजनांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पशुवैद्यकीय व आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, मोठ्या प्रमाणावर अँटी-रेबीज लसीकरण, तक्रारींवर तातडीने कार्यवाही आणि कचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, माजी महापौर कांचना यन्नम, नगरसेवक नारायण बनसोडे, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले, डॉ. वाळवेकर आदी उपस्थित होते.
शहरातील विविध भागांत निर्बीजीकरणाची मोहीम अधिक व्यापक करण्यासह प्राणी जन्मनियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारींवर जलद कार्यवाही करण्यासाठी सध्या उपलब्ध डॉग कॅचिंग वाहनांची संख्या वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यानुसार दोन नवीन डॉग कॅचिंग वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
विशेष लसीकरण मोहीम
भटक्या कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर अँटी-रेबीज लसीकरण करण्यासाठी शहरात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागनिहाय नियोजन करून निर्बीजीकरण आणि लसीकरणाचा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. रेबीज संशयित अथवा अत्यंत आक्रमक कुत्र्यांबाबत सुरक्षित पकड, निरीक्षण आणि पशुवैद्यकीय तपासणी करून लागू कायदे व नियमांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढण्यामागे
उघड्यावर पडणारा कचरा एक कारण
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढण्यामागे उघड्यावर पडणारा कचरा हेही एक कारण असल्याने कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासोबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
नागरिकांनी विलंब न करता
वैद्यकीय उपचार घ्यावेत : कोंड्याल
नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राथमिकता असून वैज्ञानिक, कायदेशीर, मानवीय आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.कुत्रा चावल्यानंतर नागरिकांनी विलंब न करता वैद्यकीय उपचार घ्यावेत, याबाबतही जनजागृती करण्याच्या सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी दिल्या आहेत.
—–