सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माता-बालकांचे आरोग्य, बालकांचे पोषण आणि आरोग्यविषयक जनजागृतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आणि आशा सेविकांचा पाटखळ येथे सन्मान करण्यात आला. सेवा संकल्प अभियाना अंतर्गत श्री सिद्धनाथ मंगल कार्यालयात या कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती तथा सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सदस्या दीपली आनंद ताड यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रांत समाजहितासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम ठेवण्यात अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आणि आशा सेविकांची भूमिका महत्त्वाची आहे. गर्भवती महिलांची काळजी, माता-बाल आरोग्य, बालकांचे पोषण, लसीकरणाबाबत जनजागृती तसेच विविध आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या महिला सातत्याने करतात. त्यांच्या सेवेमुळे गावपातळीवर आरोग्यविषयक जनजागृतीला चालना मिळते.
या महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करणे आणि समाजात त्यांच्या कामाविषयी आदराची भावना निर्माण करणे, हा या सन्मान सोहळ्याचा प्रमुख उद्देश होता.ग्रामीण भागातील आरोग्य, पोषण आणि बालविकासासाठी निष्ठेने काम करणाऱ्या महिलांच्या योगदानाला समाजातून सातत्याने प्रोत्साहन व सन्मान मिळावा, हा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
यावेळी अंजली समाधान आवताडे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण, संगीता दुधाळ, प्रदीप खांडेकर, रमेश भांजे, पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे आणि आप्पासो निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट
महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन
महिलांचे योगदान केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य, बालविकास आणि ग्रामीण समाजाच्या उभारणीतही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याबरोबरच त्यांना आवश्यक प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला.
Post Views: 16