सांगोला – रेल्वे क्र.०१४५१ कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेस रेल्वेचे सांगोल्यात शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेल्या या रेल्वेचे पूजन संघटनेचे उपाध्यक्ष मकरंद पाटील, प्रकाश खडतरे, अशोक वाघमारे तसेच इंजिनचे लोको पायलेट चंदेश्वर कुमार, समाधान गोसावी, गार्ड संतोष गोफणे, स्टेशन मास्तर निरंजन सिंह यांचा सत्कार बाळासाहेब सावंत, मुकुंद हजारे, अनिल तारळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे बंडूनाना खडतरे, बाळू निमकर, रोहित पानसाडे, विक्रम पानसाडे, राजेंद्र पाटील उपस्थित होते. सणासुदीच्या काळात ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवासी वर्गाला मोठी सोय उपलब्ध झाली आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम तसेच रेल्वे स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. महत्त्वाच्या शहरांना जोडणारी ही रेल्वे सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार असून प्रवाशांनी नव्या रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा. या रेल्वेला अक्कलकोट व गाणगापूर येथे थांबा मिळावा यासाठी तसेच ही रेल्वे सेवा कायमस्वरूपी सुरू राहण्याकरता पाठपुरावा सुरू आहे, असे संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
चौकट-
मिरज-कुर्डूवाडी दरम्यान सांगोल्यातून स.८.३० वा. नंतर किमान १० तास रेल्वे सेवा उपलब्ध नव्हती. शहीद अशोक कामटे संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या रेल्वेचा पर्याय स. ११ वा. मिळाल्याने प्रवाशांची पंढरपूर, कुर्डूवाडी, सोलापूरकडे व परतीच्या प्रवासात कोल्हापूरकडे जाण्याकरिता सोय झाली आहे. संघटनेच्या पाठपुराव्याबद्दल आभार व अभिनंदन !
-मयूर ढोले, प्रवासी