वळसंग – महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे नाशिक येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’ पुरस्कार वितरण आणि आगामी वर्षाच्या अभियानाचा भव्य राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्यातील अनेक आदर्श सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात ग्रामीण विकासातील दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वे डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.)उपमहासंचालक यशादा,पुणे यांच्या मार्गदर्शन व प्रयत्नाने ही भेट घडून आली .—वळसंग गावचे सरपंच श्री जगदीश अंटद आणि दुष्काळमुक्तीसाठी ‘जलतारा’ मॉडेलद्वारे क्रांती घडवून आणणारे जालन्याचे डॉ. पुरुषोत्तम वायाळ एकत्र आले.
या खास भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी ग्रामीण भागातील शाश्वत विकास, जलसंधारण आणि लोकसहभागातून गावांचा कायापालट कसा करता येईल, यावर सविस्तर चर्चा केली.
‘जलतारा’ आणि ‘समृद्ध पंचायत’ यांचा मेळ:
डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून विकसित केलेल्या शास्त्रशुद्ध ‘जलतारा’ (शोषखड्डे) पद्धतीमुळे महाराष्ट्रातील शेकडो दुष्काळी गावांमध्ये भूजल पातळी वाढली आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.०’ मध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसुरक्षितता, जलस्रोतांचे बळकटीकरण आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर वळसंगचे सरपंच श्री जगदीश अंटद आणि जलतज्ज्ञ डॉ. वायाळ यांच्यातील ही भेट आगामी काळात ग्रामीण पातळीवर जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अत्यंत दिशादर्शक ठरणार आहे.
नाशिक येथील या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राला पाणीदार आणि समृद्ध बनवण्याचा निर्धार या दोन्ही मार्गदर्शकांनी व्यक्त केला असून, त्यांच्या या भेटीचे छायाचित्र सध्या ग्रामीण विकास क्षेत्रात कौतुकाचा विषय ठरत आहे.