सोलापूर – ग्रामीण विकासाच्या योजनांना केवळ प्रशासकीय मंजुरीपुरते मर्यादित न ठेवता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० आणि घरकुल योजनांमधील प्रलंबित कामांना गती देऊन पात्र लाभार्थ्यांना दिलासा द्या, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले. अक्कलकोट पंचायत समिती येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत ग्रामपंचायत स्तरावरील अंमलबजावणीवर भर दिला.
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ अंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील घरकुलांच्या प्रगतीचा आढावा घेताना मंजुरी, अनुदान वितरण आणि प्रत्यक्ष बांधकाम यांमधील स्थिती समोर आली. एकूण ११ हजार १४२ घरांचे उद्दिष्ट असताना ११ हजार ८६ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत ३ हजार २३५ घरेच पूर्ण झाली असून, घरकुल पूर्णत्वाचे प्रमाण २९.०३ टक्के आहे.
त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतरही बांधकाम सुरू न झालेल्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. घरकुल योजनेचा खरा लाभ घर पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांना मिळतो. त्यामुळे अनुदान वितरणाबरोबरच प्रत्यक्ष बांधकामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे, कामातील अडथळे दूर करणे आणि प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अक्कलकोट पंचायत समिती येथे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून अभियानातील कामांचे नियोजन, प्रगतीचा आढावा आणि विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे.
या बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अभियानाची उद्दिष्टे, ग्रामपंचायत स्तरावरील जबाबदाऱ्या आणि आवश्यक कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक ग्रामपंचायतीने अभियानातील कामांचे नियोजन करून नियमित आढावा घ्यावा आणि निर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी समन्वयाने कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे, प्रलंबित बाबींचा नियमित आढावा घेणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे जैन यांनी नमूद केले. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल मुंडे, गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता विद्याधर राठोड, पशुसंवर्धन अधिकारी दीपक कडवे, बांधकाम विभागाचे उपअभियंता विशाल लेंगरे, जलसंधारण विभागाचे अधिकारी, विविध विभागांचे विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
चौकट
अनुदानाचे हप्ते वितरित; बांधकाम पूर्णत्वावर भर
घरकुल योजनेअंतर्गत १० हजार ७३१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता, ६ हजार ६७९ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, ४ हजार ७९१ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता, तर १ हजार ४३७ लाभार्थ्यांना चौथा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मंजूर घरकुलांच्या तुलनेत पूर्ण झालेल्या घरांची संख्या वाढविण्यासाठी बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधावा, अडचणींचे निराकरण करावे आणि बांधकामाची नियमित पाहणी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिल्या.