सोलापूर – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 2 हजार 549 मतदारांची मतदारांची अंतिम यादी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 321 वैयक्तिक मतदार असून उर्वरित संस्था प्रतिनिधी मतदारांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली असून 2 हजार 549 मतदारांची ही यादी पुणे विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हा बँकेत प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रारुप मतदारयादीत 2 हजार 485 मतदारांची नावे होती. या यादीतील नावावर हरकती दाखल झाल्या होत्या. यावर झालेल्या सुनावणीनंतर अक्कलकोट तालुक्यातील एका पतसंस्थेच्या प्रतिनिधीचे नाव कमी करण्यात आले तर पंढरपूर तालुक्यातील 40 दूध संस्था प्रतिनिधींच्या नावांचा तर सांगोला तालुक्यातील 25 दूध संस्था प्रतिनिधींचा अशा एकूण 65 नावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.






















