पंढरपूर – तालुक्यातील आंबे गावात उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, पोलिसांनी गांजाची ४४४ झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे ३४ लाख ७१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील रांझणी परिसरातील आंबे गावात उसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित शेतात कारवाई केली. या वेळी उसाच्या पिकामध्ये लपवून ठेवलेली गांजाची ४४४ झाडे आढळून आली. पोलिसांनी ही झाडे काढून जप्त केली. जप्त केलेल्या गांजाच्या झाडांचे एकूण वजन सुमारे ६९ किलो ४२४ ग्रॅम इतके आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ३४ लाख ७१ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान या प्रकरणी नितीन मोहन शिंदे (वय २१) आणि मोहन वासुदेव शिंदे (वय ५४) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. गांजाची लागवड केल्याप्रकरणी अंमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम अर्थात एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लाळवार करीत आहेत.
Post Views: 8