तालुक्यातील कसबे सुकेणे शिवारात वडाळी रस्त्यावरील कॅनॉलजवळ निरभवणे या शेतमजुराच्या खळ्यात प्रवेश करीत बिबट्याने नऊ शेळ्यांच्या नरडीचा घोट घेतला. यात या सर्व शेळ्या ठार झाल्या असून, शेतमजुराचे मोठे नुकसान झाले आहे.
काय घडलं?
कैलास मल्हारी निरभवणे हे कसबे सुकेणे परिसरात पाच नंबर कॅनालजवळ राहतात. येथे त्यांचे शेळ्या-मेंढ्यांचे फार्म आहे. यात बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दोन बिबट्यांनी तुटलेल्या पत्र्यामधून शिरकाव करून शेळ्यांवर हल्ला चढवला. तासभर चाललेला थरार निरभवणे कुटुंबाने डोळ्यांसमोर अनुभवला. यात बिबट्यांनी नऊ शेळ्या ठार केल्या. येवला विभागाचे वनक्षेत्रपाल अक्षय म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय वनपाल भगवान जाधव, वनरक्षक राजेंद्र दौंड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या ठिकाणी पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
उदरनिर्वाहाचे साधन गेले
चालक म्हणून काम करणारे कैलास निरभवणे हे शेळी व मेंढीपालनाचा जोडधंदा करतात. त्यांना मुलाचे व मुलीचे लग्न करायचे होते. अशातच ज्या शेळी-मेंढी पालनावर निरभवणे यांचा उदरनिर्वाह सुरू होता, त्यावरच हल्ला चढवला. यामुळे हे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.
विहिरीत पडल्याने सहा हरणांचा मृत्यू
मनमाड : अन्न व पाण्याच्या शोधार्थ फिरणाऱ्या हरणांमागे कुत्र्यांची टोळी लागल्याने धावता धावता दहा हरणांचा हा कळप जळगाव बुद्रुक येथील एका विहिरीत पडला. यात सहा हरणांचा बुडून मृत्यू झाला, तर चार हरणांचा जीव वाचविण्यात वन विभागाचे कर्मचारी व वन्यजीव प्रेमींना यश आले. हरणांचा कळप विहिरीत पडल्याचे कळताच आसपासच्या नागरिकांनी व वन्यजीव प्रेमींनी धाव घेत विहिरीत उतरून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. चार हरणांना जिवंत बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले. सर्पमित्र प्रभाकर निकुंभ, सरपंच कृष्णा अहिरे, वनविभागाचे पाटील, गंडे यांनी या कामी विशेष प्रयत्न केले. वन कर्मचारी व वन्यजीव बहुउद्देशीय संस्था, नांदगाव यांनी तीन हरणांना नैसर्गिक अधिवासात सोडले, तर एकावर उपचार सुरू आहेत.