कोकणात अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. युवा पिढी या नशेच्या आहारी जातानाचं वास्तव अनेक ठिकाणी समोर येऊ लागलं आहे. पोलिसांनी अवघ्या कोकणासह रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड, मुंबई, नवी मुंबई परिसरातही या अमली पदार्थांच्या विरोधात कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेंतर्गत रायगड पोलिसांनी खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल सुमारे २१८ कोटी रुपयांचा एमडी या महागड्या अमली पदार्थाचा साठा जप्त केल्याने अवघ्या कोकणातच नव्हे तर मुंबईच्या वेशीवरही मोठी खळबळ उडाली आहे. रायगड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अंचल केमिकल कंपनीत करण्यात आलेल्या कारवाईतून हा सगळा माल परदेशीही पाठवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खोपोली पोलिस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावचे हद्दीत अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याच्या माहिती रायगड पोलिसांना मिळाली होती. खोपोली पोलिसांनी छापा मारुन केलेल्या कारवाईत संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (C), २२ (C) सह कलम २९ प्रमाणे दि. ०८/१२/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर कारवाईवेळी पोलिसांनी १०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ तसेच त्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल इत्यादी साहित्य जप्त केले होते. या धडाकेबाज कारवाईत अमली पदार्थांच्या या गुन्ह्यात ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, खालापुर यांनी दि. १४ डिसेंबर २०२३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून या तपासात आणखी काही माहिती आणि धागेदोरे समोर येतात का हे पहाणे आणि सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक संशयित आरोपी अॅन्थनी पाऊलोस करीकुट्टीकरण याने खोपोली पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे होनाड गाव, ता. खालापूर येथे एका गोडावुनमध्ये लपवून ठेवलेला एकूण ७ बॅरेलमधील एकूण १७४.५ किलो वजनाचा २१८ कोटी १२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे एमडी म्हणजेच मेफेड्रॉन (Mephedrone) अंमली पदार्थ १० डिसेंबर २०२३ रोजी रायगड पोलिसांनी जप्त केले. या गुन्ह्यातील अटक आरोपींनी काही अंमली पदार्थ हे परदेशात पाठवलेले असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्याबाबत अधिक तपास सुरु आहे, अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.