सोलापूर – सोन्याच्या दुकानातून तोंडाला स्कार्फ बांधलेल्या महिलेने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून दुकानातून ४ ग्रॅम सोने लंपास केले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने त्या महिलेचा शोध घेण्यास गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले. त्या महिलेकडून ३.९ ग्रॅम सोन्यासह मुद्देमाल जप्त करीत चोरीचा गुन्हा दोन तासात उघड केला.
सावित्री श्रीशैल गायकवाड (वय ३४ रा. मल्लिकार्जुन नगर) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. २४ ऑक्टोबर रोजी सराफ गल्ली येथील करजगीकर ज्वेलर्समध्ये कर्मचाऱ्यांची नजर चुकवून एका महिलेने ३.९ ग्रॅम वजनाचे सोने लंपास केले होते. ही घटना सीसीटीव्हीमध्ये जतन झालेली होती. याबाबत भीमाशंकर शेटप्पा करजगीकर (रा.३५ अ. पूर्व मंगळवार पेठ,सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान गुन्हे शाखेचे सहा पोलिस निरीक्षक मुकेश गायकवाड व त्याचे पथक गस्त घालत होते. त्यांनी गुन्हा दाखल होताच करजगीकर यांच्या दुकानात जावून सीसीटीव्हीची पाहणी केली, त्यानंतर दुकानाच्या बाहेर व परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली, ती महिला दुकानातून बाहेर पडल्यानंतर एका रिक्षामध्ये बसून जाताना दिसली,त्या रिक्षा चालकाचा नंबर पथकाने मिळाला, त्या महिलेस कुठे सोडले याविषयी माहिती घेतली. त्यानंतर दोन तासात त्या महिलेस ताब्यात घेत,तिच्याकडून ४५ हजाराचे ३.९ ग्रॅम सोने हस्त केले.
पुढील कारवाई करण्यासाठी सदर संशयित आरोपी महिलेस जोडभावी पेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.


















