क्रवारी, १० मे रोजी देशभरात अक्षय्य तृतीयेचा सण साजरा होणार आहे. या दिवशी सोने खरेदीचे विशेष महत्त्व असते. त्यामुळे तुम्हीही उद्या सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्या-चांदीची किंमत काय आहे जाणून घ्या. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील दोन महिन्यात (मार्च-एप्रिल) सोन्या-चांदीच्या दरांनी उंचच उंच भरारी घेतली तर अलीकडच्या दिवसातील घसरणीमुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला.
परंतु अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर आता पुन्हा एकदा सोने-चांदीच्या भावात वाढ नोंदवली गेली आहे. अक्षय्य तृतीयेला एक दिवस बाकी असताना सोन्याच्या दरात किंचित वाढ होताना दिसत असून देशभरात १० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ७२,००० रुपये झाली आहे.
सोन्या-चांदीची झळाळी वाढली
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा जून वायदा १०९ रुपयांनी वाढून ७१,१५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला जो गेल्या सत्रात ७१,१२७ रुपयांवर बंद झाला होता. सुरुवातीच्या सत्रात दरांनी ७१,२३६ रुपयांवर उडी घेतली होती. दुसरीकडे सोन्याच्या चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आणि ४०० रुपयांहून अधिक वाढ नोंदवली गेली. जुलै चांदीचे फ्युचर्स ४११ रुपयांनी वाढून ८३,४०५ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. अशाप्रकारे, सध्या मुंबईत २४ कॅरेट सोने ७२,१६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ८५,२०० रुपये प्रति किलो दराने विक्रीस उपलब्ध आहे.
सोने-चांदीच्या दरात चढ-उतार
याआधी बुधवारी जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव १५० रुपयांनी घसरून ७२,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावला होता. त्याचवेळी, चांदीचा भावही ३०० रुपयांनी घसरून ८४,७०० रुपये झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (वस्तू) सौमिल गांधी यांनी सांगितले की, दिल्ली बाजारात स्पॉट गोल्ड (२४ कॅरेट) ७२,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे, जे मागील बंद किंमतीपेक्षा १५० रुपयांनी कमी आहे.
दुसरीकडे, देशांतर्गत बाजाराप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किमती वाढत आहेत. गुरुवारी, कॉमेक्सवर जून सोन्याचे फ्युचर्स ९.६३ डॉलरने महागले आणि २,३१८.६१ प्रति औंसवर पोहोचले. त्याचवेळी, कॉमेक्सवर मे फ्युचर्सचा भाव ०.२८ डॉलरने किंचित महागाईसह २७.५९ डॉलरवर पोहोचला आहे.
अक्षय्य तृतीया आणि सोन्याचे कनेक्शन
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारा, त्यामुळेच लोक या दिवशी सोने खरेदी करतात किंवा गुंतवणूक करतात. या दिवशी केलेली गुंतवणूक कायम तुमच्यासोबत राहते असे मानले जाते. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीया २१ एप्रिलला होती आणि तेव्हा सोन्याचा भाव ५९,८४५ रुपये होता. अशा प्रकारे एका वर्षभरात सोन्याची किंमत सुमारे १४,०० रुपयांनी वाढली आहे.