वर्ष संपता संपता इन्फोसिसला मोठा आर्थिक फटका बसला आहे. तब्बल १२,५०० कोटी रुपयांचा करार संपुष्टात आला आहे. हा करार तीन महिन्यांपूर्वी करण्यात आला होता.
वर्ष संपता संपता देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनीला मोठा धक्का बसला आहे. सप्टेंबरमध्ये इन्फोसिसनं एका जागतिक स्तरावरील कंपनीसोबत केलेला मोठा करार मोडला आहे. हा करार १.५ अब्ज डॉलर म्हणजेच १२५०० कोटी रुपयांचा होता. याबद्दलची माहिती इन्फोसिसकडून देण्यात आलेली आहे.
बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, इन्फोसिसनं २३ डिसेंबरला जागतिक कंपनीसोबतचा करार संपुष्टात आल्याची माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेशी (एआय) संबंधित असलेला करार मोडण्यात आल्याचा फटका इन्फोसिसला बसू शकतो. कंपनीनं इन्फोसिससोबतचा सामंजस्य करार संपुष्टात आणला आहे. हा करार १५ वर्षांचा होता. सप्टेंबर २०२३ मध्ये करार करण्यात आला होता.
इन्फोसिस आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जागतिक कंपनीला डिजिटल एक्सपीरियन्स आणि एआय सोल्युशन्स पुरवणार होती. या करारामुळे इन्फोसिससाठी गेला सप्टेंबर महिना काँन्ट्रक्ट व्हॅल्यूच्या दृष्टीनं उत्तम गेला. पण अवघ्या तीन महिन्यांतच या कराराला ब्रेक लागला आहे.
इन्फोसिसनं याबद्दलची माहिती शेअर बाजाराला देण्यात आली आहे. जागतिक कंपनीनं आमच्यासोबतचा सामंजस्य करार संपुष्टात आणला आहे, असं इन्फोसिसकडून सांगण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांतला हा कंपनीसाठीचा दुसरा झटका आहे. कंपनीचे माजी सीएफओ नीलांजन रॉय यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे कंपनीला मोठा धक्का बसला. आता १२५०० कोटींचा करार रद्द झाला आहे.
नारायण मूर्ती सहसंस्थापक असलेल्या इन्फोसिसनं चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ६,२१२ कोटींची कमाई केली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीची तुलना करता नफ्यात ३ टक्क्यांची वाढ झाली. मागील वर्षात याच तिमाहीत कंपनीचा नफा ६,०२६ कोटी रुपये होता. इन्फोसिसचं बाजार भांडवल ६.४६ लाख कोटी रुपये आहे. इन्फोसिसच्या शेअरची किंमत शुक्रवारी १.६० टक्क्यांनी वाढून १,५६०.६० रुपयांवर पोहोचली.