माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत.
जिल्हाधिकारी यांनी त्याबाबत लेखी सूचना देत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या अर्जात शेती,व्यवसाय उत्पनाचे स्रोत, नोकरी न दाखविल्याने रणजितसिंह निंबाळकर यांनी हरकत घेतली आहे.
दुपारी दोन वाजेपर्यंत कागदपत्रे सादर करा असे आदेश दिल्याने दोन्ही उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. वकिलांचा फौजफाटा घेत दोन्ही उमेदवार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडताना माध्यमांना माहिती दिली. दोन वाजेपर्यंत आमचे वकील सर्व कागदपत्रे सादर करतील.
दरम्यान या आक्षेपानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत सुनावणी घेण्यात येणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे दोनच्या दरम्यान कागदपत्रे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.