जयपूर, 22 जून (हिं.स.) : राजस्थानमधील अवैध वाळू उत्खनन प्रकरणी आज, शनिवारी सीबीआयने जयपूर, जोधपूर आणि बिकानेरसह राजस्थानमधील 10 प्रमुख शहरांमध्ये छापे टाकले. झडतीदरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 20 लाख रुपये रोख आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे.
सीबीआयच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी या शहरांमध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. अवैध वाळू उत्खननाचे प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयने टाकलेला हा दुसरा छापा आहे. यापूर्वी सीबीआयने खडी माफियांविरुद्ध कारवाईचा भाग म्हणून बुंदी येथे छापे टाकले होते. चंबल आणि बनास नद्यांच्या आसपासच्या परिसरात अवैध वाळू उत्खनन प्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला कारवाईचे निर्देश दिले आहेत. ही कारवाई त्याचाच एक भाग आहे. अवैध वाळू उत्खनन प्रकरणी सीबीआयने माफियांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरू आहे. सीबीआय स्थानिक पोलिसांकडूनही सहकार्य घेत आहे. अलीकडेच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही वाळू उत्खननाप्रकरणी कठोर कारवाईचा इशारा दिला होता.