आज अक्षय्य तृतीया हा सण आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते. परशुराम हे भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी सहावे अवतार मानले जातात. हिंदू धर्मात जे सात चिरंजीव मानले जातात त्यांमध्ये भगवान परशुरामांचा देखील समावेश होतो.
कथेनुसार, जमदग्नी ऋषी करत असलेल्या हवनासाठी त्यांची पत्नी आणि परशुरामांची आई रेणुका दर दिवशी नदीवर पाणी आणायला जायची. एके दिवशी तिला नदीजवळ गंधर्वराज चित्ररथ काही अप्सरांसह विहार करताना दिसले. ते पाहून ती आसक्त झाली आणि तिथेच थांबून ते पाहू लागली. त्यामुळे तिला पाणी घेऊन जायला उशीर झाला आणि हवनकाल संपला.
त्यामुळे महर्षी जमदग्नी क्रोधित झाले. त्यांनी रेणुका हिला उशीर झाल्याचं कारण विचारलं, तेव्हा तिने खरं सांगितलं नाही; मात्र जमदग्नी ऋषींकडे दिव्य दृष्टी होती. त्यामुळे त्यांना तिथे काय घडलं हे माहिती होतं. पत्नी रेणुका हिने खोटं सांगितल्यामुळे जमदग्नी ऋषी क्रोधित झाले.
त्यांनी तिला सांगितलं, की ‘परपुरुषाचा विहार पाहून तू पतिव्रता स्त्रीच्या मर्यादेचं उल्लंघन केलं आहेस. या अपराधासाठी तुला मृत्युदंड देत आहे.’ क्रोधित झालेल्या महर्षी जमदग्नींनी रुमणवान या आपल्या मोठ्या मुलाला बोलावलं आणि अपराधाची शिक्षा म्हणून आईचा वध करण्यास सांगितलं. ते ऐकूनच तो थरथर कापू लागला.
ज्या आईने जन्म दिला, तिची हत्या कशी करू, असा प्रश्न त्याला पडला. त्याने नकार दिल्यावर सर्व मुलांना महर्षींनी बोलावलं आणि हेच करायला सांगितलं. सर्वांनी नकारच दिला; मात्र परशुरामाने वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं आणि आपली आई व चारही भावांचा देखील वध केला.
परशुरामाची आपल्याप्रति असलेली भक्ती आणि त्याने केलेलं आपल्या आज्ञेचं पालन पाहून महर्षी जमदग्नी खूश झाले. त्यांनी परशुरामाला वरदान मागण्यास सांगितलं. त्यावर परशुरामांनी सांगितलं, की ‘माझी आई आणि चारही भावांना जिवंत करा आणि या वधाशी संबंधित असलेल्या त्यांच्या साऱ्या आठवणी पुसून टाकण्याचं वरदान मी मागतो आहे.’ हे ऐकताच महर्षी जमदग्नी प्रसन्न झाले. त्यांनी आपली पत्नी आणि चारही मुलांना जिवंत केलं.