वेळापूर – पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी गावाला जाताना किंवा सुट्टीनिमित्त बाहेरगावी प्रवास करताना आपल्या घराची व मौल्यवान वस्तूंची योग्य ती सुरक्षा करावी, असे आवाहन वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांनी केले आहे.
प्रभारी अधिकारी आशिष कांबळे म्हणाले की, “सध्या लग्नसराई, सुट्ट्या व विविध सणांच्या निमित्ताने अनेक कुटुंबे बाहेरगावी जात असतात. अशा वेळी बंद घरांवर चोरट्यांची नजर असते. त्यामुळे नागरिकांनी आपली कष्टाची कमाई, सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घरात किंवा कपाटात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावी. बँकेचा लॉकर हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.”
ते पुढे म्हणाले, “आपण किती दिवसांसाठी बाहेरगावी जात आहोत याची माहिती विश्वासू शेजारी किंवा जवळच्या नातेवाईकांना द्यावी. घरातील सर्व लाईट्स किंवा टीव्ही सतत सुरू ठेवू नयेत; मात्र घराबाहेरील एखादा दिवा सुरू ठेवल्यास घरात वर्दळ असल्याचा आभास निर्माण होतो.”
सोशल मीडियाच्या वापराबाबतही त्यांनी नागरिकांना सावध केले. “प्रवासादरम्यान किंवा गावाला गेल्यानंतर लगेच फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर फोटो किंवा प्रवासाची माहिती पोस्ट करणे टाळावे. त्यामुळे चोरट्यांना घर बंद असल्याची माहिती मिळू शकते,” असे त्यांनी सांगितले.
प्रवास करताना अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ किंवा पेय स्वीकारू नये, तसेच महिला व एकटे प्रवास करणाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी पेपर स्प्रे व महत्त्वाचे पोलीस संपर्क क्रमांक जवळ ठेवावेत, असेही त्यांनी नमूद केले.
“सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. सावध राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या सुट्ट्या व प्रवास आनंददायी व सुखरूप करा,” असे आवाहन प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांनी केले.
Post Views: 7