टेंभुर्णी- राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख यांच्या वतीने माढा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी चार महिने पुरतील व 20 हजारांहून अधिक लोकांना उपयोगी ठरतील इतका मोफत औषध पुरवठा आज खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत माढा ग्रामीण रुग्णालय येथे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.आरती पाटणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पूरग्रस्त भागातील लोकांना अनेक मदतीचा ओघ असताना पुराच्या पाण्यामुळे पूरग्रस्त गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते या गोष्टीची जाणीव ठेवून 20 हजारांहून अधिक नागरिकांना पुरतील इतका औषध साठा देण्यात आला.
यावेळी आमदार अभिजीत पाटील म्हणाले की,आमचे सहकारी सुरज देशमुख यांनी पूरग्रस्त भागातील लोकांचे आरोग्य या पुराच्या पाण्यामुळे धोक्यात येऊ शकते हे ओळखून 20 हजारांहून अधिक लोकांची या मोफत औषधांच्या माध्यमातून काळजी घेतली आहे. त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून त्यांनी कायमच सामाजिक भान जपले आहे.
सुरज देशमुख म्हणाले की,खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार अभिजीत पाटील यांनी पुर परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मदतीचा ओघ कायम ठेवला. आपण ही समाजाचे देणे लागतो या भावनेतून पुराच्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे हे पाहून तालुक्यातील पूरग्रस्त गावातील 20 हजारांहून लोकांना तीन-चार महिने पुरतील इतका मोफत औषध साठा आज तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. भविष्यात ही कोणत्याही नैसर्गिक संकटात आपण लोकांसाठी मदतीची भावना ठेवून सेवा करणार आहे.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे,मा.जि.प.सदस्य भारत शिंदे यांनीही मनोगत व्यक्त करत या सामाजिक कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख,रविंद्र पाटील,बाळासाहेब ढवळे-पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपूजे,युवती जिल्हाध्यक्षा विनंती कुलकर्णी,जिल्हा उपाध्यक्ष राम मस्के,वैद्यकीय अधीक्षक डाॅ.मेमाने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


















