रांची, 03 जुलै (हिं.स.) : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची जामिनावर मुक्तता होताच राज्यात खांदेपालटाची प्रक्रिया सुरू झाली. मुख्यमंत्री चम्पई सोरेन यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांनी समर्थकांसह राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. आता पक्षकार्यकर्ते आणि सहयोगी पक्षांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते रविवारी 7 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती पुढे आलीय.
झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांनी बुधवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची नेता म्हणून निवड केली. त्यानंतर मुख्यमंत्री चम्पई सोरेन यांनी संध्याकाळी 7.15 वाजता राजभवनात जाऊन आपला राजीनामा सोपवला. चम्पई सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना राजीनामा सोपवल्यानंतर हेमंत सोरेन यांनी नवीन सरकार स्थापनेसाठी दावा केला. यादरम्यान हेमंत सोरेन यांनी झामुमो, आरजेडी आणि काँग्रेस आमदारांच्या स्वाक्षरीचे समर्थन पत्रही राज्यपालांना सोपवले.
त्यानंतर आता हेमंत सोरेन रविवारी 7 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती पुढे आलीय. दरम्यान झारखंड विधानसभेच्या निवडणुकांसाठी अवघे 4 महिने शिल्लक असताना मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यामुळे चम्पई सोरेन नाराज असल्याची माहिती पुढे आलीय. हमेंत सोरेन आणि स्टिफन मरांडी यांनी चम्पई सोरेन भेट घेऊन समजूत काढल्याची माहिती झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांनी दिली.