हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले परराष्ट्रमंत्री यांचा देखील मृत्यू झाला आहे. इराणसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. रविवारी रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते. त्यात अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये ९ ते १० जण उपस्थित होते. त्यापैकी कोणी जिवंत नसल्याचे बचाव पथकाकडून सांगण्यात येत आहे.
इराणचे अध्यक्ष रविवारी अझरबैजान येथे एका धरणाचे उद्घाटन केल्यानंतर हेलिकॉप्टरमधून परत निघाले होते. त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. त्यातील दोन हेलिकॉप्टर आपल्या निश्चित स्थळी पोहोचले. पण, तिसरे विमान पोहचले नाही. हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर ३० मिनिटात त्याचा संपर्क तुटला होता. हेलिकॉप्टरचा अपघात रविवारी दुपारी १ वाजता म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता झाला. प्रयत्न केल्यानंतरही हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर बचावपथक रवाना करण्यात आले होते. शोधमोहिमेत हे हेलिकॉप्टर सापडले असून त्याचा चक्काचूर झाला आहे.
रईसी यांच्यासह परराष्ट्रमंत्री हुसैन अमिर अब्दुल्लाहिआन हे देखील या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र या दुर्घटनेत कोणताही प्रवासी बचावण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात असल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. त्यानंतर गेल्या १० तासांपासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. बचावपथक रवाना करण्यात आले होते, पण खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे मदत कार्यात अडथळा येत होता. ड्रोन्सची देखील मदत घेण्यात आली होती. डोंगर भागात हा अपघात झाला होता. याठिकाणी रात्रीच्या ठिकाणी तापमान खूप कमी असते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत बचाव मोहीम राबवण्यात आली होती.
बचावपथकाला अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आढळून आले होते. त्यानंतर इब्राहिम रईसी आणि त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या इतरांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे त्यांच्या बचाव कार्यात अडथळा येत होता. अखेर त्याचे हेलिकॉप्टर सापडले, पण या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान युरोपीयन यूनियनने देखील बचावकार्यात सहभाग घेतला होता. रॅपिड मॅपिंग सर्व्हिस सक्रिय करण्यात आली होती. यामुळे तंतोतत स्थितीची माहिती मिळत असते. याशिवाय, इराणने तुर्कीला मदत मागितली होती. नाईट व्हिजन आणि रेस्क्यू हेलिकॉप्टर तुर्कीकडून पुरवण्यात आले होते. याशिवाय सौदी अरेबियाने देखील मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, इराणचे अध्यक्ष आता या जगात नसल्याचं समोर येत आहे.
अध्यक्ष रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन यांच्याशिवाय हेलिकॉप्टरमध्ये पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती, तबरीझचे इमाम मोहम्मद अली अलीहाशेम, एक पायलट, सहवैमानिक, क्रू प्रमुख, सुरक्षा प्रमुख आणि अंगरक्षक होते.
कोण आहेत इब्राहिम रईसी?
इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा जन्म इराणच्या मशहद शहरात १९६० मध्ये झाला. रईसी यांचे वडील मौलवी होते. रईसी पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. धर्म आणि राजकारण हे रईसी यांचे आवडते विषय आहेत. महाविद्यालयीन आयुष्यापासूनच त्यांनी आंदोलनांमध्ये आणि विविध चळवळींमध्ये भाग घेतला.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी या अपघाताचा देशाच्या कारभारावर परिणाम पडणार नाही, असे म्हणत नागरिकांना धीर दिला आहे.
कठीण काळात आम्ही इराणसोबत – पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या बातमीने मी चिंतेत आहे. या कठीण काळात आम्ही इराणसोबत आहोत.