नवी दिल्ली, ३० जून (हिं.स.) : ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाला भारतीय संघाने शनिवारी गवसणी घातली. या विजयामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेतील जेतेपद मिळवण्यासाठीची भारताची १७ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात एकच जल्लोष झाला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट बार्बाडोसला फोन लावून भारतीय संघाचे अभिनंदन केले.
भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटवर एक व्हिडिओही पोस्ट केला. त्यामध्ये मोदींनी म्हटले की, आपल्या संघाने दिमाखदार अंदाज ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकला आहे. आम्हाला भारतीय संघाच्या या कामगिरीचा गर्व आहे. भारतीय संघाने देशातील प्रत्येक गावगल्लीतील लोकांची मनं जिंकली आहेत. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना हारला नाही, ही उल्लेखनीय गोष्ट आहे.
पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भारतीय संघाशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी मोदींनी रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी उत्तमप्रकारे सांभाळल्याबद्दल शाबासकी दिली. तर विराट कोहलीने अंतिम सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना केलेल्या ७६ धावांच्या खेळीचे कौतुक केले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचा अफलातून झेल पकडला. पंतप्रधान मोदी यांनी सूर्यकुमार यादवच्या या कॅचचे कौतुक केले. याशिवाय, मोदींनी जसप्रीत बुमराहच्या कामगिरीचीही प्रशंसा केली.