२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार ॲड. शरद बनसोडे हे पाच लाख १७ हजार ८७९ मते घेऊन खासदार झाले. २०१९च्या निवडणुकीत डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पाच लाख २४ हजार ९८५ मते मिळवली व ते खासदार झाले. या दोन्ही खासदारांपेक्षा २१ ते २८ हजार मते जास्त घेऊनही भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागला हे विशेष. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढलेले सव्वालाख मतदान काँग्रेससाठी फायद्याचे ठरले.
मोदी लाटेत २०१४च्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात गेलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ २०१९च्या निवडणुकीतही याठिकाणी भाजपनेच बाजी मारली. २०१४च्या निवडणुकीत काँग्रेससमोर थेट भाजपचे उमेदवार ॲड. शरद बनसोडे यांचे आव्हान होते. या निवडणुकीत काँग्रेसचे केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा त्यांनी पराभव केला होता. २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसला विजयाची आशा होती, पण याही निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पराभव केला. दहा वर्षे राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने या मतदारसंघात कमबॅक करणे काँग्रेससाठी मुश्किल होते. २०१४ व २०१९ च्या दोन्ही निवडणुकीत भाजपचे मतदान वाढले होते. २०१४च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ॲड. बनसोडे यांना पाच लाख १७ हजार ८७९ मते मिळाली होती. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींना पाच लाख २५ हजार ९८५ मते मिळाली. तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ॲड. बनसोडे यांच्या तुलनेत २८ हजार १४९ तर डॉ. महास्वामी यांच्या तुलनेत २१ हजार ४३ मते जास्त मिळाली.