नवी दिल्ली, ३० जून (हिं.स.) : कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीमुळे तब्बल १७ वर्षांचा दुष्काळ संपवत भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाला गवसणी घातली. दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर दोन्ही दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
यावर विराटने म्हटले की, हा माझा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप होता, ही माझी शेवटची मॅच होती. एक दिवस तुम्ही एकही रन काढू शकत नाही, त्यानंतर हे होतं. देव ग्रेट आहे. आता नाही तर कधीच नाही, अशी आजची स्थिती होती. या सामन्यात विजय झाला नसता तरीही मी निवृत्ती घेणार होतो. आता पुढच्या पिढीने T20 क्रिकेट आणखी पुढे घेऊन जायची वेळ आली आहे. आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी आम्हाला बरीच वाट पाहावी लागली. रोहितने 9 टी-20 वर्ल्ड कप खेळले, मी 6 खेळले. तो हे डिजर्व्ह करतो’, असं विराट म्हणाला. संघाला सर्वात जास्त गरज असताना मी कामगिरी करू शकलो याबद्दल मी आभारी आहे, असेही विराट म्हणाला.
विराट पुढे म्हणाला, ‘हा माझा शेवटचा टी-20 सामना होता. हे आमचे स्वप्न होते, आम्हाला आयसीसी स्पर्धा जिंकायची होती, आम्हाला चषक उचलायचा होता. मी परिस्थितीचा आदर केला, एकाग्र राहिलो आणि माझ्या संघानुसार खेळलो. खरे सांगायचे तर, हे कसे घडले यावर माझा विश्वास बसत नाही, माझी स्पर्धा जितकी वाईट होती, तितकीच फायनलमध्ये कामगिरी करताना मला आनंद होतो.
दरम्यान रोहितनेही हा आपला शेवटचा सामना असल्याचं जाहीर करून टाकलं. ‘2007 साली याच फॉरमॅटमधून आपण करिअरची सुरूवात केली आणि वर्ल्ड कप जिंकला होता. आता गुड बाय करायला यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. मला यातला प्रत्येक क्षण आवडला, वर्ल्ड कप जिंकायचा मला हेच हवं होतं. माझ्यासाठी हा भावुक क्षण होता, आयुष्यात मला ही ट्रॉफी मिळवायचीच होती,’ अशी प्रतिक्रिया रोहितने दिली. माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे, मला कोणत्याही किंमतीत आयसीसी ट्रॉफी जिंकायची होती. आम्ही शेवटी ते केले याचा आनंद आहे