युजीसी नेट परिक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड झाल्याचं आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय संयुक्त सचिव गोविंद जयस्वाल यांनी आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही भूमिका मांडली.
मंत्रालयासाठी विद्यार्थ्यांचं हित सर्वोपरी असून त्यांच्या भवितव्याबाबत गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करता येईल. तोपर्यंत या प्रकरणी कोणत्याही निष्कर्षाप्रत येता येणार नाही. तपासावर परिणाम होऊ नये यासाठी आता अधिक माहिती देता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
नीट आणि नेट परीक्षा ही दोन वेगळी प्रकरणं असून त्यांची सरमिसळ करु नका, असंही ते म्हणाले.