पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे या भीतीने पाकव्याप्त काश्मीर सोडून द्यायचे का ? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित केला. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीत शाह बोलत होते.
गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले होते की, भारत सरकारने पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे. पाकिस्तानला तुच्छ लेखू नये. जर पाकिस्तानच्या एखाद्या जिहादी दहशतवाद्यांने अणुबॉम्बचा प्रयोग केला तर सर्व नष्ट होऊन जाईल असा इशारा अय्यर यांनी दिला होता. यापार्श्वभूमीवर अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनीच निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा पुढे केला आहे. ते म्हणत आहेत की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यामुळे आम्ही पीओकेबद्दल बोलू नये. अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का?, असा सवालही अमित शाह यांनी केला. विरोधक आम्ही मुस्लिम पर्सनल लॉवर बोलू, असे म्हणत आहेत. हा त्यांचा अजेंडा आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने त्यांनी त्यांचा आदर करावा, असे त्यांचे नेते सांगत आहेत. फारुख अब्दुल्ला म्हणत आहेत की, पीओकेबद्दल बोलू नका, कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. भारतासारख्या बलाढ्य देशाने अणुबॉम्बच्या भीतीने आपला प्रदेश सोडावा का ? असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला. तसेच या मुलाखतीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 5 प्रश्न विचारलेत. 1) राहुल गांधी यांना तिहेरी तलाक परत आणायचा आहे का ? 2) त्यांचा सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास आहे का? 3) ते 370 हटवण्याचे समर्थन करतात का ? 4) राहुल गांधी यांनी मुस्लिम पर्सनल लॉबाबत त्यांचे मत स्पष्ट करावे. 5) ते जनतेला सांगतील का की ते राम मंदिराच्या दर्शनाला का गेले नाहीत ? अशी प्रश्नांची सरबत्तीच शाह यांनी केलीय.