महापालिकेने सरत्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात विविध योजनांतून मिळकतदारांना दिलेल्या सवलतीपोटी मिळकतदारांची ११७ कोटी रुपयांची बचत झाली आहे. पालिकेच्या मिळकतकर विभागाच्या शिस्तबद्ध कारवाईमुळे ३०८ कोटींच्या उद्दिष्टापेक्षाही २३ कोटी रुपये अधिकची वसुली करण्यात आली. एकूण थकबाकी वसुलीपोटी २५० नळ तोडण्यात आले तर विविध २८ मिळकती सील करण्यात आल्या.
मिळकतकर विभागाने सरत्या आर्थिक वर्षात शास्ती वॉरंट फी व दंड माफीचा निर्णय घेताना थकबाकीदारांनी मिळकतकर भरण्यासाठी १०० टक्के शास्ती व दंड माफी योजना आणली. त्याला सोलापुरातील मिळकतकर थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद दिला. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेर ७४३ कोटी ५१ लाख रुपये वसुली थकीत होते, त्यापैकी ३०८ कोटी ७ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मिळकतकर विभागाने वर्षभरात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करत २३ कोटी रुपये अधिक वसुली केली. वर्षभरात ३३१ कोटी ६१ लाख ३७ हजार ५९० रुपये कर वसुली करण्यात आली आहे.