छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात आज, मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गांगलूर पोलिस स्टेशन परिसरात नक्षलवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सुरक्षा दलांना नक्षलविरोधी अभियानात पाठवण्यात आले. या टीममध्ये डीआरजी, एसटीएफ, कोब्रा आणि सीआरपीएफचा समावेश होता. ही संयुक्त टीम शोध मोहिमेसाठी गंगलूर परिसरात रवाना झाली होती. या कारवाईदरम्यान मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेंद्रा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी काही वेळ गोळीबार झाल्यानंतर नक्षलवादी तेथून पळून गेले. त्यानंतर घटनास्थळाची झडती घेतली असता 9 नक्षलवाद्यांचे मृतदेह, एक ऑटोमॅटिक लाइट मशीन गन (एलएमजी), ‘बॅरल ग्रेनेड लाँचर’ आणि इतर शस्त्रे सापडली. मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
गेल्या 1 जानेवारीपासून आतापर्यंत विजापूर जिल्ह्यासह बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 41 नक्षलवादी ठार झाले आहेत. सुकमा जिल्हा बस्तर लोकसभा मतदारसंघात आहे जेथे 19 एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.