बार्शी – बार्शी नगरपरिषदेवर अखेर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने २३ जागा जिंकून सत्ता कायम राखली तर उबाठाचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी देखील १९ जागा जिंकून चांगलीच लढत दिली.
नगराध्यक्षपदावर भारतीय जनता पार्टीच्या तेजस्विनी प्रशांत कथले यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या निर्मला बारबोले यांचा ४६८८ मतांनी पराभव करत सत्तेचे सिंहासन गाठले.
दि. २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर शासकीय धान्य गोदामात २१ प्रभागातील ४२ नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदासाठी रविवारी २१ रोजी सकाळी दहा वाजलेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. १२ टेबलच्या माध्यमातून ११ फेऱ्यांमधून सर्व प्रभागांचे निकाल निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तैमूर मुलाणी आणि राज्य निवडणूक निरीक्षक विक्रमसिंह देशमुख यांनी घोषित केले.
सुरुवातीच्या प्रभागापासून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती ती कायम शेवटपर्यंत कायम ठेवली. इतर कोणत्याही प्रभागामध्ये शिवसेनेच्या उमेदवार निर्मला बारबोले यांना ही आघाडी तोडता आली नाही. विद्यमान नगरसेवक ऍड. महेश जगताप आणि रोहित लाकाळ या दोन नगरसेवकांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
बार्शी शहरात सर्वात प्रतिष्ठेच्या झालेल्या प्रभाग ६ मधील माजी विरोधी पक्षनेते (उबाठा) नागेश अक्कलकोटे यांच्या वार्डातील प्रतिष्ठेची लढत अक्कलकोटे यांनी ८६३ मतांनी एकतर्फी जिंकून दिली तर प्रभाग १९ मधून भाजपचे भारत पवार यांना केवळ सात मतांनी निसटता विजय मिळाला. प्रभाग ७ मधून २ हजार ५०० इतक्या सर्वात मोठ्या फरकाने भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संदेश काकडे यांनी आपली जागा कायम राखली तर प्रभाग ७ मधून महायुतीच्या उमेदवार मीरा नाळे यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. प्रा. किरण देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनाही प्रभाग १८ मधून पराभवास सामोरे जावे लागले तर माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी देखील ऍड. सुशांत चव्हाण यांचा पराभव केला.
शहरातील २१ प्रभागातून सर्व २१ प्रभागाच्या सर्व मतदान केंद्रातून भाजपचे उमेदवार तेजस्विनी कथले यांना एकूण ३५ हजार ८७९ मते मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्मला बारबोले यांना ३१ हजार १९१ मते मिळाली. भाजपच्या कथले यांनी बारबोले यांचा ४६८८ मतांनी पराभव केला.
प्रभाग ६ मध्ये माजी नगराध्यक्ष कादर तांबोळी यांची कन्या व माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांची सून ताहिरा तांबोळी यांना शिवसेना उबाठाच्या सायरा मुल्ला यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. एमआयएमच्या नगराध्यक्षापदाच्या उमेदवार खाजाबी पठाण यांना ५६६ मतावर समाधान मानावे लागले तर काँग्रेसच्या जाकीराबी पठाण यांना केवळ ४६४ मध्ये मिळाली. अपक्ष सुप्रिया गुंड पाटील यांना ३७८ मते तर प्रहारच्या संजीवनी बारंगुळे यांना केवळ २५० मते मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी ‘नोटा’ला मात्र ३४१ मते मिळाली.
पक्षनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली पुढील प्रमाणे कंसात : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजयी उमेदवार प्रभाग १ : चांगुना जाधव (१७४८) वसंत देवकर (१६८१), प्रभाग ३ : अनिकेत कारंडे (१५७१), प्रभाग ६ : नागेश अक्कलकोटे (२४३३), सायरा मुल्ला (२०७३), प्रभाग ८ : अमोल मांगडे (१९४६), प्रभाग ९ : भागवत ऊर्फ सचिन मांगडे (१२८४), प्रभाग ११ : नवनाथ माळगे (१०३४), शांता नायकोजी (२३५७), प्रभाग १४ : राहूल कोंढारे (१७४२), प्रभाग १५ : महेदीमियाँ लांडगे (१७२०), रागिणी पाचपुते (१३७१), प्रभाग १६ : आकाश राऊत : (१८११), शिला साळुंखे (१७४२), प्रभाग १९ : विद्या बंगाळे (१७३१), प्रभाग २० सरस्वती भानवसे (२१८५), मुज्जमिल पठाण (१८८९), प्रभाग २१ : गोदावरी शिंदे (१४३०), कृष्णराज बारबोले (१४३७).
भाजप व शिवसेना युतीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेले मते (कंसात) : प्रभाग २ : अनिरुद्ध वाणी (१४८६), सुनीता ढोणे (१३८७), प्रभाग ३ : अर्चना बारस्कर (१५२०), प्रभाग ४ : अमोल चव्हाण (१९६१), उर्मिला मोहिते (१९१४), प्रभाग ५ : शमा रिकीबे (१३६७), राजू घोंगाने (१३८२). प्रभाग सात संदेश काकडे (३३६७). प्रभाग ८ : सुजाता मस्के (१७७०). प्रभाग नो आबेदा तांबोळी (१३७६).. प्रभाग १० : स्वप्निल उघडे (१६३७), उर्मिला मुळे (१७४३). प्रभाग १२ : भागीरथी त्रिंबके (१५७०), संतोष बारंगुळे (१७०३). प्रभाग तेरा फर्जना जलसे (२१४४), दीपक राऊत (२३८८). प्रभाग १७ : चंद्रकला कांबळे (१८१९), विजय चव्हाण (१८६२). प्रभाग १८ : रोहित पाटील (१६०९), कांचन मोहिते (१३७८). प्रभाग १९ : भारत पवार (१५२४).
या निवडणुकीत मागील वेळेचे महायुतीचे नगरसेवक संदेश काकडे हे सुमारे अडीच हजार मताच्या फरकाच्या सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले तर सर्वात कमी प्रभाग १९ मधून भाजपचे माजी शिक्षण मंडळ सदस्य भारत पवार हे केवळ ७ मतांनी विजयी झाले. तर प्रभाग १ मधील शिवसेना उबाठाचे उमेदवार वसंत देवकर हे ११ मतांनी विजयी झाले. प्रभाग ३ मधील भाजपच्या अर्चना बारस्कर यादेखील केवळ ८ मते घेऊन विजयी झाल्या.

























