घनसावंगी : शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी भाव देण्याबरोबरच येणाऱ्या काळात समृद्धी साखर कारखाना शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सांगतिले. रविवारी राणी उंचेगाव येथे समृद्धी साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांच्या हस्ते हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची शेत- पानंद रस्त्याची सर्वात मोठी अडचण होती. समृद्धी कारखान्याने स्वखर्चातून दोनशे किमी पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे रस्ते खुले करून दिले. शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात उच्चांकी भाव दिला. आता शेतकऱ्यांच्या समोर असेलल्या ऊस लागवडीचा, पत पुरवठा आणि खते आणि बियाणाचे प्रश्न सोडविण्यासाठी समृद्धी साखर प्रयत्न करणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्याबरोबर त्यांचे उत्पादनही वाढवणार असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगतिले. समृद्धी साखर कारखाना शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी सुधारित जातीचे उसाचे बेणे , कंपोस्ट खताच्या पुरवठा करण्याबरोबर तज्ञामार्फत लागवडीचे योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी उसाचे पाचट न जाळता शेतातच कुजवण्याचे आवाहन केले. तसेच ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांची स्पर्धा सुरु झाली आहे, उशिरा ऊस तुटल्यास नुकसान होईल, अशी भीती त्यांच्यात आहे. शेतकऱ्यांनी ऊस गाळपाची घाई करू नये. एकही शेतकऱ्यांचा ऊस गाळपाविना उभा राहणार नाही. असा शब्द सतीश घाटगे यांनी यावेळी दिला. समृद्धीच्या युनिट नंबर – 2 चे काम प्रगतीपथावर असून लवकरच समृद्धी कारखान्याची गाळप क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमचा सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सीएसआर निधीतून जलसंधारण मोहीम हाती घेणार
अनेक गावात पाणी अडवल्या जात नाही म्हणून पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी शिरपूर पॅटर्न पद्धतीने 10 कोटीची जलसंधारण मोहीम हाती घेण्याचा प्रयत्न समृद्धी साखर करणार आहे. त्यसाठी शेतकऱ्यांची साथ आवश्यक आहे. या मोहिमेतून 30 गावात सिमेंटचे बंधारे बांधण्याचा मानस असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले.

























