लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मे महिन्यातील पहिल्या नऊ दिवसात बाजार अक्षरशः खड्ड्यात पडला तर मागील पाच व्यापार सत्रात बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले. नवीन वर्षात शेअर बाजाराची वाटचाल अगदी धमाकेदार झाली मात्र अनेक घडामोडींमुळे बाजार निर्देशांक उच्चांकावरून खाली आपटले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (बीएसई) सेन्सेक्स उच्चांकीवरून ७२,४०० अनेकांपर्यंत घसरला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (एनएसई) निफ्टीने २१,९५७ पर्यंत घसरगुंडी घेतली आहे.
देशांतर्गत शेअर बाजारात मागील पाच दिवसात सेन्सेक्स ३.४२ टक्के किंवा २,५६३ अंकांनी कोसळला तर निफ्टी ८३३ अंक म्हणजे ३.६६ टक्क्यांनी खाली घसरला असून आठवड्यातील सर्वात मोठी घसरण गुरुवारी नोंदवली गेली. दरम्यान, शेअर बाजारात लवकरच रिकव्हरी होऊ शकते, असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे, परंतु प्रॉफिट बुकिंग आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून विक्रीचा दबाव बाजारावर कायम राहील.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले
गुरुवारी शेअर बाजाराने पुन्हा एकदा डुबकी घ्यायला सुरुवात केली आणि बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्स १,०६२ अंकांनी घसरला असून ट्रेडिंगच्या अवघ्या सहा तासांतच बाजारातील गुंतवणूकदारांचे ७.३५ लाख कोटी रुपये बुडाले. मागील काही दिवसांपासून बाजारात घसरणीचा कल सुरू असून केवळ मे महिन्यात बाजारातील घसरणीच्या आगीत लोकांचे १२.८९ लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहे. मे महिन्यात आतापर्यंत केवळ सहा बाजारात सत्रात मोठ्या घसरणीमुळे बीएसईवर सूचिबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप (बाजार भांडवल) १५.३ लाख कोटींनी घसरले असून २ मे रोजी, बाजाराच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात बीएसईचे बाजार भांडवल ४,०८,४९,७६७.९० रुपये होते जे आता ३,९३,११३,०४९.६६ रुपयांवर खाली आले आहे.