लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश आपल्यामुळे नाही, तर शिवसैनिकांच्या लढाईमुळे मिळालं आहे, असं सांगत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज आपल्या यशाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं. निवडणुकीनंतर झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
या निवडणुकीत आपण घासून नाही, तर ठासून विजय मिळवला आहे. मविआला मतदान करणारे सर्व देशभक्त आहेत, या देशभक्तांनी संविधान आणि देश वाचवण्यासाठी आम्हाला मतदान केलं आहे, असं ते म्हणाले. केंद्रात आलेलं सरकार चालेल असं वाटत नाही. हे सरकार पडलंच पाहिजे आणि पुन्हा निवडणुका झाल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.
लोकशाही वाचवणं दहशतवाद असेल, तर आपण दहशतवादी आहोत, असं ठाकरे म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत पुन्हा भाजपासोबत जाणार नाही, ज्यांनी मातेसमान शिवसेनेला फोडलं, अशा पक्षाशी युती करणं शक्यच नाही, असं ते म्हणाले. आपल्या काही जागा आल्या नसल्या तरीही भाजप अजिंक्य नाही,
हे आपण या लढाईत दाखवून दिलं. मोदींचे पाय सुध्दा मातीचेच आहेत, हे आपण सिध्द केलं आहे, असं ठाकरे म्हणाले.\आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळेच आपल्याला हे यश मिळालं आहे असं सांगत शिंदे यांनी बाळासाहेबांचं नाव आणि पक्षचिन्ह न वापरता निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान त्यांनी दिलं.