नवी मुंबई, 23 जून, (हिं.स.) – तुर्भे सेक्टर 21 नमुंमपा परिवहन आगाराकडून ठाणे बेलापूर रस्त्यावर तुर्भे स्टेशनकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या एक स्पॅनमधील साईडचा कॅन्टीलिव्हर भाग सकृतदर्शनी काही प्रमाणात सुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने संरचना कन्सल्टन्ट यांचेमार्फत या उड्डाणपुलाच्या सदर भागाची महानगरपालिकेच्या अभियंत्यांसोबत प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात आली. त्यानुसार संरचना कन्सल्टंट यांचेकडून सदर उड्डाणपूलाच्या स्पॅनचा संरचना व स्थिरता अहवाल प्राप्त करून पुढील अत्यावश्यक दुरुस्ती नमुंमपामार्फत त्वरित हाती घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने आजपासून तुर्भे वाहतूक पोलीस विभागामार्फत सदर उड्डाणपुलावरील ठाणे बेलापूर रस्त्यावर तुर्भे स्टेशनकडे जाणारी वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड व कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण गाडे यांच्यासह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून रहदारीची अडचण होऊ नये यादृष्टीने त्याठिकाणी ठाणे बेलापूर मार्गावर वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत व त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.