ठाणे, 23 जून (हिं.स.) ज्यांचे महाराष्ट्राने प्रत्येक निवडणुकीत कपडे उतरवले आहेत ते उद्धव साहेबांचे कपडे काय उतरवणार ? असा सणसणीत टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय घाडीगावकर यांनी ठाणे मनसेच्या नेत्यांना लगावला आहे.
ठाणे मनसेच्या नेत्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरे यांचे विरोधात बॅनर लावल्यानंतर संजय घाडीगावकर आक्रमक झाले असून त्यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले आहे. यामध्ये घाडीगावकर यांनी म्हटले आहे की,मनसे स्थापन झाल्यापासून त्यांचा रडीचा डाव सुरू आहे… उद्धव साहेबांवर खार खाऊन केवळ उद्धव ठाकरेंना राजकारणात टार्गेट करण्यासाठीच हा पक्ष स्थापन झाला आहे का अशी शंका येते.
बिन शर्ट पाठिंबा देणारे महाराष्ट्रावर आक्रमण होताना गप्प राहतात आणि उद्धव साहेबांना मात्र टार्गेट करतात… भाजप मिंधे गट ही गिधाडे बनून जेव्हा मातोश्रीवर हल्लाबोल करतात तेव्हा दुर्दैवाने बिनशर्ट वाले सुद्धा त्या गिधाडांच्या टोळीत सामील होतात.
ज्यांचे बाळासाहेबांनी हयात असताना नकली म्हणून कपडे उतरवले आहेत… ते उद्धव साहेबांचे कपडे या निवडणुकीत काय उतरवणार ?महाराष्ट्राने प्रत्येक निवडणुकीत बिनशर्ट वाल्यांना उघडे पाडले आहे.
तुमच्याकडे पक्ष होता, चिन्ह होत तरी तुम्ही एकही उमेदवार उभा केला नाही केवळ उद्धव साहेबांचे उमेदवार पाडण्यासाठी मिंधे आणि भाजपला बिनशर्ट पाठिंबा दिला.
उद्धव साहेबांचा पक्ष आणि चिन्ह चोरीला गेलेले असतानाही त्यांनी 9 खासदार निवडून आणले. खरं तर त्यांनी भाजप आणि टोळीच्या नाकी नऊ आणले आहेत… ओरिजनल ठाकरे ब्रँड #उद्धव बाळासाहेब ठाकरे असे घाडीगावकर यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे