घोडामैदान जवळ आहे, सैन्यही जमलंय, आता सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणारं कोणीतरी हवंय; इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाबाबत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. इंडिया
इंडिया आघाडीच्या दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या आघाडीच्या नेतृत्त्वाविषयी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. देश वाचवण्यासाठी इंडिया आघाडीतील पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, या आघाडीला आता समन्वयक किंवा निमंत्रकाची गरज आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही जबाबदारी तुमच्याकडे आल्यास तुम्ही ती स्वीकारणार का, असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्यावर बोलणे उद्धव ठाकरे यांनी टाळले. ते मंगळवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या नेतृ्त्त्वाविषयी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आजच्या बैठकीत छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर चर्चा होईल. येत्या काही दिवसांत जानेवारी महिना उजाडेल, हे निवडणुकीचं वर्ष आहे. त्यादृष्टीने तयारीला लागण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत आम्ही बाकीच्यांच्या सूचना ऐकून घेऊन आणि त्यावर आमची मतं मांडू. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर इंडिया आघाडीचा चेहरा कोण? हा विषय आहेच. पण आता या आघाडीला कोणी एक समन्वयक म्हणा, निमंत्रक म्हणा, याची गरज आहे. इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याच्या डोक्यात नेतृ्त्त्व करण्याची हवा नाही. आम्हाला देश वाचवायचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहरा निवडला नाही तरी एका निमंत्रकाची गरज आहे. उद्या निमंत्रकच पंतप्रधान होईल, असे काही नाही. निवडणुकीचं घोडामैदान आता जवळ आलंय, सैन्यही जमलंय, पण या सैन्याला पुढे घेऊन जाणारा कोणीतरी हवा. एरवी सगळे नेते आपापल्या राज्यात बिझी असतात. या सगळ्यांना एकत्र आणणारी व्यक्ती हवी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावर पत्रकारांनी त्यांना, ‘ही जबाबदारी तुमच्याकडे आली तर स्वीकाराल का?’, असा प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा उद्धव यांनी म्हटले की, मीदेखील आजच्या बैठकीत काही नावं सुचवणार आहे. तसेच मी काही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही. मी मुख्यमंत्रीपद हे जबाबदारी म्हणून स्वीकारले होते. मला जेव्हा कळाले तेव्हा मी मुख्यमंत्रीपद एका झटक्यात सोडलंही होतं. मी काही वेडीवाकडी स्वप्न पाहणार नाही. मला पंतप्रधान व्हायचंय, असं नुसतं स्वप्न पाहण्यात काय अर्थ आहे. जनतेलाही तुम्ही पंतप्रधान म्हणून हवे आहात का? याचा विचार केला पाहिजे. इंडिया आघाडीतील मतभेद आता मिटले असून सर्वजण एकत्र आले पाहिजे. आगामी काळात आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र राहायला पाहिजे. इंडिया आघाडीच्या डोळ्यासमोर पंतप्रधान मोदी नाहीत, तर भारत देश आहे. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना बदललं तसं मोदींनाही बदललं जाऊ शकतं. हा भाजपचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.