भारतीय निवडणूक आयोगाने आज, सोमवारी देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार मध्यप्रदेशात 17 नोव्हेंबर, छत्तीसगड 7 आणि 17 नोव्हेंबर, राजस्थान 23 नोव्हेंबर, मिझोराम 7 नोव्हेंबर आणि तेलंगणात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर या सर्व राज्यांमधील निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होतील. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
देशातील 5 राज्यात 16 कोटींहून अधिक मतदार असून 679 जागांवर मतदान होणार आहे. 60 लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात पीव्हीटीजी मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि और तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत.
पाच राज्यांमध्ये 8.2 कोटी पुरुष मतदार आहेत. 17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार असून, 23 ऑक्टोबरपर्यंत मतदान यादी सुधारण्याची संधी मतदारांना असणार आहे. 17,734 मॉडेल मतदान केंद्रे आणि 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. महिला 8,192 मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत.