बार्शी – जामगांव (पा) येथील चित्रकार महेश अशोक मस्के यांनी आपल्या अद्वितीय कलागुणांच्या जोरावर महाराष्ट्रासह देश-विदेशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी गव्हाच्या चपातीवर साकारलेली सुंदर कलाकृती विशेष आकर्षण ठरली असून, ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे तीन तासांचा कालावधी लागला.
चित्रकार महेश मस्के यांनी यापूर्वीही केळी, वड, पिंपळ, नारळ अशा विविध झाडांच्या पानांवर तसेच फळांवर महापुरुष, चित्रपट क्षेत्र, क्रीडाक्षेत्र, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, अधिकारी, उद्योजक आदी क्षेत्रातील मान्यवरांच्या आकर्षक कलाकृती साकारलेल्या आहेत. त्यांच्या या अनोख्या कलेमुळे त्यांनी आजपर्यंत सहा हजारांहून अधिक कलाकृती तयार करुन कलाक्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
विशेष म्हणजे, मस्के हे एका डोळ्याने अंध असून सर्व कलाकृती त्यांना दिसत असलेल्या केवळ एकाच डोळ्याच्या सहाय्याने साकार करतात, ही बाब त्यांच्या जिद्दीची आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेची साक्ष देते. त्यांच्या कलाकृतींनी महाराष्ट्राबरोबरच सौदी अरेबिया, मलेशिया, कुवेत आणि अमेरिका या देशांपर्यंत पोहोच मिळवली असून, विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. चित्रकार महेश मस्के यांच्या या अनोख्या आणि प्रेरणादायी कलाप्रवासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.























