बार्शी – शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अध्ययवत करावे, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्ष तेजस्विनी कथले यांच्याकडे महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे सदस्य व दिशा थिएटर्सचे निर्माते दीपक नलावडे, नीता देव, सूर्यकांत वायकर, पत्रकार सचिन अपसिंगकर, जयंत हिंगमिरे, यांनी दिले आहे.
हे निवेदन उपनगराध्यक्ष रोहित पाटील, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, भाजपाचे नगरसेवक नाना राऊत, ठाकरे सेनेचे गटनेते नागेश अक्कलकोटे यांनाही देण्यात आले.
या निवेदनामध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहाची नाट्य सादरीकरणाची परंपरा खूप मोठी असून ती वाढविण्यासाठी विविध सुधारणा सुचविण्यात आले आहेत.
या निवेदनामध्ये या नाट्यगृहाची साऊंड सिस्टीम सुधारण्यात यावी, नाट्यगृहाची आसन क्षमता वाढविण्यात यावी, नाट्यगृहामध्ये स्त्री व पुरुष कलावंतांसाठी दोन स्वतंत्र ड्रेसिंग रुमची व्यवस्था करण्यात यावी, तसेच महत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र विश्राम कक्षाची उभारणी करण्यात यावी, कलावंत व प्रेक्षकांसाठी स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावी, या नाट्यगृहाशेजारी उपहारगृह तसेच पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, नाट्यगृह परिसरामध्ये नाटकांच्या जाहिरातीसाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात यावी.
अशा विविध मागण्या करण्यात आले आहेत.
आज सकाळी बार्शी नगरपालिकेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करत या मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या सुधारणा करण्यात येतील असे सांगितले.






















