सोलापूर : लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना विविध सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यात सोलापूर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तब्बल १४८ नागरी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देतानाच प्राप्त होणाऱ्या सुमारे ९८ टक्के अर्जांचा विहित कालमर्यादेत निपटारा केला जात असल्याचे समोर आले. या कामगिरीचे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी कौतुक केले.
तेलंग यांनी ३१ जुलै २०२६ रोजी सोलापूर महानगरपालिकेला भेट देऊन लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्या ऑनलाइन संगणकीकृत प्रणालीची पाहणी करून नागरिकांना सेवा देण्याच्या प्रक्रियेची माहिती त्यांनी घेतली.
महापालिकेने विकसित केलेली ऑनलाइन प्रणाली सर्वोत्कृष्ट व प्रभावी असल्याचे तेलंग यांनी नमूद केले. नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या टाळून घरबसल्या सेवा मिळाव्यात, तसेच अर्जांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी डिजिटल प्रणाली महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून तेलंग यांनी महापालिका आयुक्त तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. नागरिककेंद्रित प्रशासन, डिजिटल सेवा आणि पारदर्शक कार्यपद्धती यांचा प्रभावी मेळ साधल्याने सोलापूर महापालिकेची कामगिरी इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्गदर्शक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
इतर महापालिकांनीही प्रणाली स्वीकारावी
सोलापूर महापालिकेने विकसित केलेल्या या प्रणालीचा इतर महानगरपालिकांमध्येही अवलंब अथवा विस्तार करण्यात आल्यास नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत लोकसेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे राज्य आयुक्तांनी स्पष्ट केले.
Post Views: 17