बार्शी – शहरातील अलीपूर रोड परिसरातील १७ वर्षीय बारावी सायन्स शाखेतील विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कॉलेजला जाते असे सांगून सकाळी घरातून सायकलवरुन निघालेली मुलगी रात्रीपर्यंत घरी परतली नाही. कुटुंबियांनी तिचा कॉलेज, मैत्रिणी, नातेवाईक तसेच परिसरात शोध घेतल्यानंतरही ती मिळून न आल्याने तिच्या आईने बार्शी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनी (वय १७) ही बार्शीतील महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी सायन्स शाखेत शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कॉलेजला जाते, असे सांगून ती सायकलवरुन घरातून निघून गेली होती.
साधारणपणे ती सायंकाळी सात वाजेपर्यंत घरी परतत असते. मात्र त्या दिवशी ती घरी न आल्याने तिच्या आईने सायंकाळी ७.१५ वाजता तिच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी फोन एका अनोळखी व्यक्तीने उचलला आणि काही वेळातच फोन कट झाला. त्यानंतर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळून आले.
यानंतर मुलीच्या वडिलांनी तिच्या कॉलेजमध्ये जाऊन शोध घेतला. महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय तसेच तेथील स्टडी क्लासमध्ये चौकशी केली असता संबंधित विद्यार्थिनी त्या दिवशी कॉलेजमध्ये आलीच नसल्याचे तिच्या वर्गातील विद्यार्थिनींकडून सांगण्यात आले. त्यानंतर कुटुंबियांनी तिच्या मैत्रिणी, नातेवाईक तसेच आसपासच्या परिसरात शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. या प्रकरणी तिच्या आईने अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, विद्यार्थिनीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 54