रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील विहिरीत दोन अज्ञात प्रौढांचे मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मृतदेहांची ओळख अद्यापही पटलेली नसून एकाच वेळी दोन मृतदेह सापडल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आहे.
ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यातील एक मृतदेह अंदाजे ४५, तर दुसरा अंदाजे ५० वर्षे वयाच्या प्रौढाचा आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस पाटील लाड यांना माहिती देताच त्यांनी पूर्णगड पोलिसांना याची खबर दिली. पूर्णगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले.
सुमारे ४५ 45 वर्षे वय असलेल्या प्रौढाच्या मृतदेहाच्या अंगात काळा टीशर्ट, चॉकलेटी ट्रॅक पॅन्ट, गळ्यात जानवे हातात लाल दोरा आहे, तर ५० वर्षे वयाच्या प्रौढाच्या मृतदेहावर पांढरा टीशर्ट आणि राखाडी ट्रॅक पॅन्ट, गळ्यात लाल दोरा आहे. या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम पूर्णगड पोलिसांनी सुरू केले आहे.