कर्नाटकातील काँग्रेस नेते एच. अंजनेय यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच आमचे राम आहेत असे विधान केले आहे. अंजनेय यांच्या या विधानामुळे कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला आहे.
‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच आमचे राम आहेत,’ असे विधान कर्नाटकातील काँग्रेसचे नेते एच. अंजनेय यांनी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘अयोध्येत २२ तारखेला मंदिरात प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्ती भाजपचा राम म्हटले पाहिजे,’ असेही अंजनेय म्हणाले.
अंजनेय यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मला मिळालेले नाही. त्यामुळे तिकडे जायचे की नाही, ते अद्याप ठरवलेले नाही,’ असे विधान सिद्धरामय्या यांनी गेल्या आठवड्यात केले होते. या पार्श्वभूमीवर अंजनेय यांनी वरील विधाने केली आहेत. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्रीच आमचे राम आहेत. त्यांनी कशाला अयोध्येला उद्घाटन समारंभासाठी जायला हवे? मुख्यमंत्र्यांच्या मूळ गावी राम मंदिर आहे, तिथे ते पूजा करू शकतात.’
अयोध्येत स्थापन केली जात असलेली मूर्ती भाजपचा राम आहे. ते (आयोजक) फक्त भाजपच्या लोकांना आणि भजने म्हणणाऱ्यांना निमंत्रणे धाडत आहेत. त्यांना तसे खुशाल करू देत. आमचा राम सर्वत्र आहे, तो आमच्या हृदयात आहे.
– एच. अंजनेय, नेते, काँग्रेस
अंजनेय मूर्ख : यत्नाळ
भाजपचे नेते बसवनगौडा यत्नाळ पाटील यांनी अंजनेय यांना प्रत्युत्तर दिले. ‘अंजनेय यांनी भगवान राम आणि इतर हिंदू देवतांविषयी आदर आणि सन्मानाने बोलावे,’ असे यत्नाळ यांनी म्हटले आहे. ‘असले मूर्ख, हिंदूविरोधी आमचे मंत्री होते, हे आमचे दुर्दैव,’ अशी टीका यत्नाळ यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केली आहे.