केरळच्या कन्नूरमध्ये आज, शनिवारी मोठा रेल्वे अपघात टळला. कन्नूर-अलाप्पुझा एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसचे 2 डबे अचानक रुळावरून खाली घसरले. सुदैवाने घटनेच्या वेळी गाडीमध्ये प्रवासी नव्हते. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ हे डबे रूळावर आणण्याचे काम केले. त्यामुळे कन्नूर येथून पहाटे 5 वाजता निघणारी ही गाडी सकाळी 6.45 वाजता रवाना होऊ शकली.
यासंदर्भात कन्नूर रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार कन्नूर-अलाप्पुझा एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस आज, शनिवारी पहाटे 4.40 वाजता रेल्वे स्थानकावर आणत असताना या गाडीचे शेवटचे 2 डबे रुळावरून घसरले. सुदैवाने घटनेच्या वेळी गाडीत प्रवासी नसल्यामुळे या अपघातात कुणाला हानी झाली नाही. दरम्यान, अधिकारी सतर्क झाले आणि रेल्वे रुळावर आणण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. ही ट्रेन आज पहाटे 5.10 वाजता कन्नूरहून निघणार होती, पण रुळावरून घसरल्याने ती सकाळी 6.45 वाजता सुटली. रुळावर अडकलेले दोन्ही डबे हलवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान रेल्वेने या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.