पश्चिम बंगालच्या संदेशखाली हिंसाचारातील मुख्य आरोपी शाहजहान शेख याला आज, गुरुवारी अटक करण्यात आली. ईडीच्या पथकावरील हल्ल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेता असलेला शेख फरार होता. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीला बशीरहाट न्यायालयात हजर केले असता त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शाहजहान शेख उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील मीनाखा येथील एका घरात लपला होता, तिथून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून 14 दिवसांची कोठडी मागितली. मात्र न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यामधील संदेशखाली इथल्या महिलांनी शाहजहान शेख आणि त्याच्या समर्थकांवर लैंगिक शोषण आणि जमिनी बळकावल्याचा आरोप केला आहे. राज्याच्या ऍडव्होकेट जनरलच्या अर्जावर हायकोर्टाने गेल्या सोमवारी शहाजहान शेखला अटक करण्याचे आदेश दिले होते.
न्यायमूर्ती टीएस शिवगणनम यांच्या एकलपीठाने 7 फेब्रुवारीच्या आदेशात ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या संयुक्त विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) स्थापनेला स्थगिती दिली होती. त्यानंतर शेख हा बराच काळ फरार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर न्यायालयाने सीबीआय आणि ईडी शेखला अटक करण्यास मोकळे असल्याचे निर्देश दिले होते. तत्पूर्वी बुधवारी उच्च न्यायालयाने दिल्लीहून आलेल्या फॅक्ट फाइंडिंग टीमला संदेशखालीत जाण्याची परवानगी देण्यात आली. गेल्या रविवारी समितीच्या प्रतिनिधींनी संदेशखळी येथे जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना मज्जाव केला होता. समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौशिक चंद्र यांच्या खंडपीठाने त्यांना संदेशखाली येथे जाण्याची परवानगी दिली.