सोलापूर, 31 जुलै (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ४७४ पीएच.डी.च्या जागांसाठी आज (मंगळवारी) ‘पेट’ पार पडली. सोलापूरसह देशभरातील तीन हजार २६७ जणांनी विविध ठिकाणांहून यशस्वीपणे परीक्षा दिली. सुरवातीला काहीवेळ सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांना लॉगइनसाठी अडचणी आल्या; त्या हेल्पलाइनवरून सोडविण्यात आल्या. तरीपण, काही विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र समिती नेमली आहे.
विद्यापीठाने पहिल्यांदाच हायटेक पाऊल उचलून ‘पेट’ ऑनलाइन पद्धतीने घेतली. तत्पूर्वी, २५ व २६ जुलैला मॉक टेस्ट देखील घेतली होती. त्यामुळे परीक्षार्थींना फारशा अडचणींचा सामना करावा लागना नाही. काहींना नेटवर्क कमी असल्याने वेळेत लॉगइन करता आले नाही, पण तीन हजार ८७ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली. वेब बेस्ड परीक्षेच्या सूचनांचे पालन न केलेल्या १८० जणांवर कारवाई करण्यात आली आणि ते आपोआप परीक्षेतून लॉग-आउट झाले. त्यांच्या शेजारी कोणीतरी होते, परीक्षार्थी किंवा समोरील व्यक्ती एकमेकांशी बोलत होते, परीक्षार्थींची नजर इतरत्र गेल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
आता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात तक्रारी केल्या आहेत, त्यांचा डेटा घेऊन त्या तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे. सध्या पावसाळा सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने त्यांना परीक्षा केंद्रांवर येऊन परीक्षा देणे अशक्य होते. पण, विद्यापीठाच्या या ऑनलाइन वेब बेस्ड प्रणालीमुळे त्यांना त्यांच्याच घरातून परीक्षा देता आल्याने अनेकांनी विद्यापीठाचे आभार मानले.