तभा फ्लॅश न्यूज/नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि निर्यात वाढवण्याच्या गरजेवर भर देत भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याचा मार्ग स्पष्ट केला आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आज जे देश जगात दादागिरी करत आहेत, ते आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान आहेत आणि त्यांच्या हाती नवनवीन तंत्रज्ञान आहे. त्यामुळे ते इतरांवर दबाव टाकू शकतात. त्यांनी स्पष्ट केले की, भारतानेही निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे अत्यावश्यक आहे, तेव्हाच आपली अर्थव्यवस्था सक्षम बनेल.
आर्थिक सामर्थ्याचा दादागिरीत वाटा
नितीन गडकरी म्हणाले, जर आपले निर्यात प्रमाण आणि अर्थव्यवस्थेची वाढ दर चांगली राहिली, तर आपल्याला कोणाकडेही मदतीसाठी जाण्याची गरज पडणार नाही. आज जे देश दादागिरी करत आहेत, त्यांची ताकद त्यांच्या आर्थिक स्थितीत आणि तंत्रज्ञानात आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, आपण चांगले तंत्रज्ञान आणि आवश्यक संसाधने मिळवू शकतो, पण आपण कधीच कोणावर दबाव आणणार नाही, कारण भारतीय संस्कृती आपल्याला ‘विश्वकल्याण’ हेच सर्वोच्च ध्येय शिकवते.
तंत्रज्ञान आणि निर्यात ही विकासाची गुरुकिल्ली
नितीन गडकरी यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन वाढवण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्याची ताकद भारताकडे असावी. निर्यात वाढली आणि आयात घटली, तर देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल.

















